
राज्यातील मंत्रिमंडळात या नेत्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार?
कोकाटे यांची हकालपट्टी निश्चित? पण धनाभाऊचे पुनरागमन अशक्य? मराठवाड्यातील हा नेता होणार मंत्री?
पुणे – : राज्य मंत्रिमंडळात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. सत्तेतील तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहे. भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट हे सध्या वादाच्या भोवऱ्यात असणारे मंत्री आहेत.
राज्य मंत्रिमंडळातून काही वादग्रस्त मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याच्या चर्चा आहे. जर या मंत्र्यांची गच्छंती झाली तर यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. अशातच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तानाजी सावंत मंत्रिमंडळात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून दूर केल्यास धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. अशातच शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज येथे तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी गेले होते. सावंत यांच्यावर अलीकडेच एंजिओप्लास्टी झाली असून, त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी शिंदे स्वतः त्यांच्या घरी गेले होते. मात्र, या भेटीमागे केवळ तब्येतीची चौकशी की काही मोठा राजकीय डाव? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून तानाजी सावंत नाराज आहेत. त्यामुळे मंत्रिपद देऊन त्यांची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्यास, कोणत्या विद्यमान मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार यावरही चर्चेला उधाण आले आहे. सध्या कृषी खाते असलेल्या माणिकराव कोकाटे, तसेच संजय शिरसाट यांचे मंत्रिपद संकटात असल्याचे वृत्त आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना घेऊन संपूर्ण राज्यभर आंदोलन उभं केलं जाईल. शेतकरी विरोधाची झळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू नये, यासाठी अजित पवार कोकाटे यांना मंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे.