
… त्यामुळे दत्तामामा भरणेंना लागली कृषीमंत्रीपदाची लाॅटरी
पडद्यामागे नेमकं काय घडलं, भरणेंच्या आधी या नावाची होती चर्चा, कोकाटेंच्या रमीमुळे पक्ष अडचणीत पण भरणे खुशीत
पुणे – माणिकराव कोकाटे यांनी रम्मी खेळल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट अडचणीत आला असला तरी इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांना मात्र मोठा फायदा झाला आहे. कारण भरणे यांना थेट कृषीमंत्री पदाची लाॅटरी लागली आहे.
दत्तात्रय भरणे महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तर झाले, पण त्यांच्याकडे क्रीडा युवक कल्याणसारखे खाते मिळाले होते. त्यामुळे भरणे काहीसे नाराज देखील होते. त्यामुळे त्यांनी खुप उशीरा या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुरूवातीला त्यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले नव्हते. पण हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सोडल्यानंतर भरणे यांना पालकमंत्रीही करण्यात आले. महत्वाचे म्हणजे माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलायचे आणि ते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना द्यायचे असेच सुरुवातीला ठरले होते, पण पाटील यांनी मदत, पुनर्वसन खाते मी समजून घेतले आहे, आता हेच खाते माझ्याकडे ठेवा, असे त्यांनी अजित पवार यांना गुरुवारी सकाळीच सांगितले. त्यामुळे भरणे यांचा पर्याय समोर आला. माणिकराव कोकाटेंचे कृषी खाते बदलले नाही तर शेतकरी आणि मराठा समाजाची नाराजी पत्करावी लागेल आणि त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज आल्यानंतर खातेबदल करण्यात आला आहे. रम्मी जरी कोकाटे खेळले असले तरी तो डाव मात्र भरणे यांनी जिंकला आहे. दरम्यान कोकाटेंवर कारवाई करुन अजित पवार यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, तर कोकाटेंची खांदेपालट करुन विरोधकांच्या विरोधाची धार कमी करण्याचाही प्रयत्न केला आहे.
दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा, कोकाटेंची उचलबांगडी आता पुढचा नंबर कुणाचा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीनंतर कुणाचा शिवसेना शिंदे गटाचा नंबर लागणार का? हे पहावे लागणार आहे.