
प्रायव्हेट चॅट व्हायरल करण्याची धमकी देत उकळले ३० कोटी
नवरा-बायकोने बॉसलाच हनीट्रॅपमध्ये अडकवले, यासाठी रचला होता सापळा, धक्कादायक प्रकार उघडकीस
केरळ – आयटी कंपनीच्या मालकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या जोडप्याला केरळातील एर्नाकुलममध्ये अटक करण्यात आली आहे. हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
श्वेता बाबू आणि कृष्णा राज असे आरोपी जोडप्याचं नाव आहे. श्वेता बाबू आयटी कंपनीत १८ महिने काम करीत होती. याच काळात तिनं पतीच्या मदतीनं हनीट्रॅपचा प्लॅन रचला. श्वेतानं आयटी मालकासोबत चॅट्स केले. त्यानंतर कृष्णानं ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. ‘तुझे श्वेतासोबत अनैतिक संबंध आहेत. तुमच्या दोघांचे खासगी चॅट्स व्हायरल करू का? तुमची प्रतिमा मलिन करू का? तुझ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करू’, अशी धमकी त्यांनी आयटी मालकाला दिली. जोडप्याने २३ जुलै रोजी संबंधित आयटी कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांना एर्नाकुलममधील एका हॉटेलमध्ये बोलावून ३० कोटी रुपयांची मागणी केली. कृष्णा राजच्या बँक खात्यात १० कोटी रुपये त्वरित जमा करण्यास सांगितलं. उर्वरित २० कोटींसाठी दोन चेकची मागणी केली. दुसऱ्या दिवशी २० कोटी रुपयांचे दोन चेक घेतले. घडलेल्या प्रकारानंतर आयटी कंपनीच्या मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली.
कृष्णाचे अनेक व्यवसाय होते. त्यापैकी हॉटेल व्यवसायात त्यांना नुकसान झालं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून खंडणी उकळण्याचा कट रचला होता. आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.