
भाजपाचा हा नेता होणार भारताचा उपराष्ट्रपती?
भाजपाचा उमेदवार ठरला?, या तारखेला होणार अधिकृत घोषणा, इंडिया आघाडीचे आव्हान?
दिल्ली – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची नामांकन प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पदासाठी भाजपाने उमेदवार निश्चित केला आहे.
भाजपने संभाव्य नावांची शॉर्टलिस्टिंग सुरू केली आहे, जी लवकरच पंतप्रधान मोदींसमोर अंतिम निर्णयासाठी ठेवली जातील. एनडीएने पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले आहेत. भाजपाकडून सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे नाव आघाडीवर आहे. आचार्य देवव्रत हे देखील त्याच जाट समाजातून येतात, ज्या समाजाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड होते. त्यामुळे जाट समाजाला संदेश देण्यासाठी त्यांना ही संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. त्याचबरोबर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत आणि शेषाद्री चारी यांची नावेही चर्चेत आहेत. विरोधी पक्षांची इंडिया आघाडीदेखील या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मागील निवडणुकीत एनडीएकडे स्पष्ट बहुमत होते, पण या वेळी स्थिती वेगळी आहे. त्यामुळे विरोधक जर सर्वसमावेशक आणि स्वीकारार्ह चेहरा निवडून पुढे आणतील, तर एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकते. दरम्यान वडणूक आयोगाने ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली असून याबरोबरच नामांकन प्रक्रियाही सुरू झाली आहे. अधिसूचनेनुसार, नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे आणि पडताळणी २२ ऑगस्ट रोजी केली जाईल. नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट आहे.
एनडीए संसदीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ‘ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनडीए संसदीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत, एनडीएने पंतप्रधान आणि राज्यसभेतील सभागृह नेते जेपी नड्डा यांना उमेदवाराच्या निवडीसह सर्व प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकार एकमताने दिले आहेत. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय एनडीएच्या सर्व पक्षांना मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.