
ठरल! महापालिका निवडणूका ठाकरे बंधू एकत्र लढणार
'या' चार शहरात युतीची घोषणा, महायुतीला रोखण्यासाठी ठाकरे ब्रँड एकत्र, महायुतीत अस्वस्थता
मुंबई – हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर मागील महिन्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश मागे घेतला. ज्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. पण राजकीय युतीबाबत मात्र साशंकता होती. पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे.
ठाकरे बंधू सगळ्या महापालिका एकत्र लढणार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्येही आम्ही एकत्र लढू. यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली या महानगर पालिकांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथं आमची एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची ही वज्रमूठ तोडू शकत नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र निवडणूका लढवणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता यावर आज नाशिकमध्ये बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत ठाकरे बंधु एकत्र आल्यास भाजपाला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कारण शिंदे गटाची ताकत मुंबईत कमी असल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत दिसून आली आहे. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर शिंदे गटाला अस्तित्वासाठी लढा द्यावा लागणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या सोसायटीसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे.