
चक्क गाणे म्हटल्यामुळे तहसीलदारावर निलंबनाची कारवाई
गाणे म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल, ही चूक पडली महागात, नेमके काय घडले?
नांदेड – निरोप समारंभ कार्यक्रमात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणे म्हणणे एका तहसीलदाराला चांगलेच महागात पडले आहे. खुर्चीवर बसून गाणे म्हणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
प्रशांत थोरात हे उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते. ८ ऑगस्ट रोजी थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी मंजुषा भगत ह्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. दरम्यान रेणापूर येथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ८ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या निरोपाने भारावलेल्या तहसीलदारांनी आपल्या खुर्चीवर बसून ‘तेरा जैसा यार कहा’, हे गाणं गायलं. हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये थोरात विविध हातवारे करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही असा सूर व्यक्त करण्यात आला. या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर कसे वावरावे, याबाबत एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.
विभागीय आयुक्तांनी मंत्र्यांच्या आदेशानंतर थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या अभूतपूर्व कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.