
विवाहित प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
लग्नानंतरही अनैतिक संबंध, पोलीसांमुळे अनैतिक संबंधाला नकार, प्रियकराचे चाकूने वार करत हत्याकांड
खानापूर – प्रियकरानेच प्रेयसीचा खून कऊन स्वत:ही चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यात समोर आली आहे. या घटनेमुळे बिडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रेश्मा तिरवीर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर आनंद सुतार असे हत्या करून आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. रेश्मा आणि आनंद दोघेही एकाच गावचे रहिवासी आणि लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांच्यात कॉलेजपासूनच प्रेमसंबंध होते. मात्र रेश्माचे लग्न गावातीलच शिवानंद या युवकासोबत झाले, तर आनंदचेदेखील लग्न दुसऱ्या एका तरुणीशी झाले. मात्र तरीही दोघांमध्ये मागील काही वर्षांत अनैतिक संबंध सुरू होते. रेश्माला दोन मुलं आहेत. तर आनंदला तीन मुलं असून त्याची पत्नी गर्भवती आहे. दोघांनाही आपापली कुटुंब असताना या दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू झाले. रेश्मा हिच्या पतीला याची माहिती समजतात त्याने आपल्या पत्नीला ताकीद दिली होती. तरीही आनंदशी ती बोलतच होती. रेश्मा ही आनंद बरोबर मोबाईलवर बोलताना शिवानंदने पाहिले. त्यावेळी त्याने पोलिसात तक्रार दाखल केले. पोलिसांनी आरोपी आनंदला रेशमाशी सगळे संबंध तोडण्याची ताकीद दिली. व समज देऊन त्याला सोडण्यात आलं. मात्र याचाच राग आनंदच्या मनात बसला. रेश्मा हिचा पती शिवानंद नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी डेअरीला गेला होता. यावेळी रेश्मा व तिची मुलगी, मुलगा घरी होते. पाठीमागच्या दरवाजातून आनंद हा हातात चाकू घेऊन रागाने रेश्माच्या घरी घुसला. त्याने काही क्षणातच रेश्माच्या पाठीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने रेश्मा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् गतप्राण झाली. रेश्मा हिचा मृतदेह पाहताच आनंदने त्याच चाकूने स्वत:वर ही वार करून घेतले. घाव वर्मी लागल्याने आनंद त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही घटना कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. एका अनैतिक प्रेमसंबंधातून दोन जीव गेल अन् दोघांचे संसार उघड्यावर पडले. त्यांची मुले पोरकी झाल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
अनैतिक नातं तुटल्यामुळे सूडभावनेतून आनंदने केलेला हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नंदगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.