Latest Marathi News
Ganesh J GIF

कॅबिनेट मंत्री या प्राध्यापकासोबत चढणार बोहल्यावर

मंत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, राजकुमारीशी झाला होता घटस्फोट, माजी मुख्यमंत्र्याशी आहे नाते

शिमला – हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. पहिली पत्नी राजकुमारी सुदर्शना सिंह यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ते पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत.

विक्रमादित्य सिंह अमरीन कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. त्यांची लग्नपत्रिकाही समोर आली आहे. विक्रमादित्य सिंह यांचा २२ सप्टेंबर २०२५ रोजी अमरीन कौर यांच्याशी विवाह होणार आहे. चंदीगढमध्ये हा विवाह सोहळ्या पार पडणार आहे. मंत्री विक्रमादित्य यांचे यापूर्वी लग्न झाले होते. पहिले लग्न फार काळ टिकले नाही. त्यांचे पहिले लग्न उदयपूरच्या राजघराण्यातील सुदर्शना यांच्यासोबत झाले होते. ८ मार्च २०१९ मध्ये विक्रमादित्य सिंह यांचा विवाह झाला होता. त्यानंतर चार वर्षातच त्यांच्या संसार मोडला. दोघांनी २०२४ मध्ये घटस्फोट घेतला होता. विक्रमादित्य सिंह यांच्या होणाऱ्या पत्नी अमरीन कौर या पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड येथे सायकॉलॉजीच्या (मनोविज्ञान) सहाय्यक प्राध्यापिका आहेत. असे सांगितले जात आहे की अमरीन या विक्रमादित्य सिंह यांच्या जुन्या मैत्रिणी आहेत. अमरीन कौर यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार जोतिंद्र सिंह सेखों आणि आईचे नाव सरदारनी ओपिंद्र कौर आहे. विक्रमादित्य सिंह यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवरून भाजपच्या उमेदवार म्हणून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत निवडणूक लढत होत्या. तिथे विक्रमादित्य सिंह पराभूत झाले होते. विक्रमादित्य सिंह सध्या शिमला ग्रामीणचे आमदार असण्यासोबतच हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह हे राजा वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. राजा वीरभद्र सिंह हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. लग्नात अनेक राजकीय, सामाजिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!