
मूल होत नसल्यामुळे सासरच्यांनी केली विवाहितेची हत्या?
लग्नापासूनच सुरु होता छळ, चारित्र्यावर संशय, धारधार हत्याराने केली हत्या, घरासमोरच केले अंत्यसंस्कार
नाशिक – लग्नानंतर मूलबाळ होत नसल्याचा राग तसेच चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करत डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करीत विहिरीत लोटून देत खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे.
पूजा वैभव आहेर असे मृत विवाहितेचे नाव असून, वडगावपंगू येथे ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत विवाहितेचा भाऊ अभिजीत कैलास गवळी याने चांदवड पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बहिण पूजा हिचे पती वैभव मोहनदास आहेर, सासरे मोहनदास नारायण आहेर, सासू राजुबाई उर्फ लताबाई मोहनदास आहेर, दीर केशव मोहनदास आहेर, जाऊबाई रूपाली केशव आहेर यांनी बहीण पूजा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन व तिला मुलबाळ होत नाही या कारणावरून तिला लग्न झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपासून ते २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचा छळ केला. तसेच धारधार हत्याराने मारहाण करुन तिला गंभीर जखमा करुन जीवे ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह सासरच्या घराच्या पाठीमागील शेतातील विहीरीत फेकून दिल्याबाबत फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार शेखर रंधे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह मनमाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, पूजा यांच्या डोक्यावर जखमा असल्याने हा घातपातच असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले आहेत. पोलीसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.