
कहर ! ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर नाचवल्या नर्तिका
सोशल मिडियावर व्हिडिओ जोरदार व्हायरल, शासकीय यंत्रणा अनभिज्ञ, कारवाई होणार?
नाशिक – बैलपोळा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला. पण या सणाला गालबोट लागण्याचा प्रकार समोर आला आहे. कारण बैलपोळा सणानिमित्त निफाड तालुक्यातील शिवरे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयावर नर्तिका नाचवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
निफाड तालुक्यातील शिवरे गावात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बैलपोळा सणानिमित्त नर्तिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील चांदवड-सिन्नर महामार्गावर शिवरे हे छोटेसे गाव आहे. बैलपोळा नाशिक जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा झाला असताना दुसऱ्या दिवशी शिवरे हे गाव अचानक प्रसिध्दीच्या झोतात आले. कारण सोशल मिडियावर शिवरे गावातील ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सर डान्स करताना दिसून आल्या. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. बैलपोळ्याची मिरवणूक सोडून नर्तकी शासकीय इमारत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर गेल्याच कशा, असा प्रश्न प्रत्येकाकडून विचारला जात आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषद आणि निफाड पंचायत समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे. ग्रामसेवकांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की,कार्यालय बंद असताना हा प्रकार घटना आहे. त्यामुळे याची चाैकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठवला जाणार आहे. त्यानंतर आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
निफाड पोलिसांकडून आयोजक व डीजे मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण गावात या नर्तिका कोणी आणल्या, आणि त्या कार्यालयावर डान्स करण्यासाठी का गेल्या? याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.