
महिला शिक्षिकेची चिमुकल्या लेकीसह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा, मुलीला मांडीवर घेत पेट्रोल ओतून घेतले, संजूसोबत नेमके काय घडले?
जोधपूर – सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या हुंड्याच्या छळाला कंटाळून शिक्षक असलेल्या महिलेने आत्महत्या केली आहे. अंगावर पेट्रोल ओतून महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं नंतर निष्पाप मुलीलाही पेटवून घेतले. यामुळे खळबळ उडाली आहे.
संजू बिश्नोई नावाच्या शिक्षिकेने शुक्रवारी दुपारी शाळेतून लवकर घरी परतल्यानंतर स्वतःला आणि आपली तीन वर्षांची मुलगी यशस्वीला पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ही घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. घरातून धूर निघताना पाहून शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु यशस्वीचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान संजूचा मृत्यू झाला. संजूच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारिरीक छळाचा आरोप केला आहे. तसंच हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तगादा लावला होता ज्याला कंटाळून संजूने आयुष्य संपवल्याचा आरोप संजूच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये हुंडा मागण्याचे कारण दिले आहे. सुसाईड नोटमध्ये पती, सासू, सासरे आणि नणंदेवर छळाचा आरोप केला आहे. यासह तिनं गणपत सिंग नावाच्या व्यक्तीवरही छळाचा आरोप केला आहे. संजू ही मूळची फिटकासनी गावची रहिवासी होती आणि तेथील राजकीय सिनिअर सेकंडरी स्कूलमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत होती. तिचं लग्न दहा वर्षांपूर्वी दिलीप बिश्नोई याच्याशी झाल होत. दिलीप हा बीटेक सिव्हिल इंजिनिअर असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. या विवाहात स्थानिक “आटा-साटा” प्रथा म्हणजेच समसमान नात जुळवले गेले होते.
संजूचा पती दिलीप बिश्नोई, तसेच तिच्या सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.