
गावकऱ्यांनी मंत्री आणि आमदाराला पळवून पळवून मारले
गाडी सोडून मंत्री आणि आमदारांनी काढला पळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, नेमके काय घडले?
नालंदा- बिहारमध्ये राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. बिहार सरकारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि हिल्साचे आमदार कृष्णा मुरारी उर्फ प्रेम मुखिया यांच्यावर संतप्त ग्रामस्थांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी पाटणाजवळील शाहजहांपूर पोलीस ठाण्यातंर्गत एक भीषण अपघात झाला होता. त्यात ९ लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यात नालंदा जवळील हिलसा ठाण्यातंर्गत येणाऱ्या मलावा या गावातील लोकांचाही समावेश होता. मृतांच्या नातेवाईकांनी भेटण्यासाठी मंत्री श्रवण कुमार मलावा गावात पोहचले. पण ते येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. मंत्री गावात दाखल झाल्यावर आणि कार्यक्रम संपताच, संतप्त ग्रामस्थांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. परिस्थिती इतकी बिघडली की अंगरक्षक आणि स्थानिक पोलिस दलालाही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. हल्लेखोर ग्रामस्थांनी मंत्र्यांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी मंत्र्यांना पायी धावत गावाबाहेर पळून जावे लागले. त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही गंभीर मारहाण सहन करावी लागली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकावर हिल्सा उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनेनंतर तातडीने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.U