
या दहा पक्षाला मिळाली तब्बल ४३०० कोटींची देणगी
अवघ्या तीन निवडणूका लढवत जमवले हजारो कोटी, भाजप आणि काँग्रेसलाही पिछाडीस, कोणते आहेत हे पक्ष?
दिल्ली – लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी ७ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे.
गुजरातमध्ये १० अज्ञात राजकीय पक्षांना पाच वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याची बातमी एका हिंदी दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. हे वृत्त समाजमाध्यमांवर शेअर करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. ‘या घटनेचा तपास करून निवडणूक आयोग दोषींवर कारवाई करेल का?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ‘निवडणूक आयोग तपास करेल की प्रतिज्ञापत्र मागेल?’ असा प्रश्न गांधी यांनी विचारला आहे. ‘गुजरातमध्ये असे काही निनावी पक्ष आहेत ज्यांची नावं कोणीच ऐकलेली नाहीत. परंतु, त्यांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा लहानमोठ्या निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्यावर पैसे खर्च केले आहेत. हे हजारो कोटी रुपये कुठून आले? हे पक्ष कोण चालवतंय? हे पैसे कोण देतंय? पेसै कोणाच्या खिशात जात आहेत? निवडणूक आयोग याचा तपास करणार आहे का? निवडणूक आयोग तपास करण्याआधी प्रतित्रापत्र मागेल का? की थेट कायदाच बदलेल? जेणेकरून हा डेटा देखील लपवता येईल, असे राहूल गांधी यांनी लिहिले आहे. विशेष म्हणजे निवडणूक अहवालात त्यांनी फक्त ३९.०२ लाख रुपये खर्च दाखवला आहे, तर ऑडिट अहवालात ३५०० कोटी रुपये खर्च दाखवला आहे. गुजरातमध्ये झालेल्या तीन निवडणुकांमध्ये (२०१९, २०२४ मध्ये दोन लोकसभा आणि २०२२ मध्ये विधानसभा) या पक्षांनी फक्त ४३ उमेदवार उभे केले आणि त्यांना एकूण ५४,०६९ मते मिळाली. या पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालांवरून हे उघड झाले आहे.
राहुल गांधी सध्या बिहारमध्ये १६ दिवसांच्या ‘मतदार हक्क यात्रे’वर आहेत. ही यात्रा १,३०० किमी पेक्षा जास्त अंतराची ही यात्रा असणार आहे. २० जिल्ह्यांमधून ही मत अधिकार यात्रा प्रवास करणार असून१ सप्टेंबर रोजी पाटणा येथे यात्रेची सांगता होणार आहे.