
या प्रसिद्ध अभिनेत्रीवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
न्यायालयाने दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश, चौकशीला सामोरे जावे लागणार, प्रकरण काय?
जयपूर – शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या विरोधात राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून दोघांच्या नावाने एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भरतपूरमधील वकील कीर्ती सिंह यांनी २०२२ मध्ये एका प्रसिद्ध कार कंपनीकडून सुमारे २४ लाख रुपयांची कार खरेदी केली होती. मात्र, काही काळानंतर गाडीमध्ये ‘मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट’ असल्याचे लक्षात आले. अनेक वेळा कीर्ती सिंह यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला. वारंवार तक्रारी करूनही कंपनीने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे कंटाळून कीर्ती सिंह यांनी भरतपूरच्या सीजेएम कोर्ट क्रमांक २ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मथुरा गेट पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी कार कंपनीचे ब्रँड अँबेसेडर असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कारण शाहरुख खान १९९८ पासून हुंडई ब्रँडचा अँबेसॅडर आहेत आणि त्याने या कंपनीच्या अनेक कार मॉडेल्सची जाहिरात केली आहे. तर दीपिका पादुकोण नुकतीच, म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये हुंडईची नवी ब्रँड अँबेसॅडर म्हणून नेमली गेली होती. कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की या सेलिब्रिटींनी जाणूनबुजून खराब उत्पादनांची जाहिरात केली, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली. या प्रकरणावर भरतपूर पोलीसांनी तपास सुरू केला असून पुढील काही दिवसांत शाहरुख, दीपिका तसेच हुंडई कंपनीचे अधिकारी यांची चौकशी केली जाणार आहे.
भारतीय कायद्यानुसार, कोणतीही सेलिब्रिटी जर एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल आणि त्या उत्पादनामुळे ग्राहकांची फसवणूक झाली असेल, तर त्या जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनाही जबाबदार धरले जाते. याच कारणामुळे या प्रकरणात शाहरुख आणि दीपिकेची नावे गुन्हा दाखल झाला आहे.