
भाजप आमदाराने शिवीगाळ करत जिल्ह्याधिकाऱ्यावर उचलला हात
घटना सीसीटीव्हीत कैद, शेतकरी प्रश्नाला बगल देत भाजप आमदारांची दादागिरी, नेमके काय घडले?
इंदोर – मध्य प्रदेशातील भिंड येथे खतांच्या टंचाईमुळे त्रस्त होऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पण हा मोर्चा टंचाईपेक्षा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण या मोर्चात भाजप आमदाराने चक्क जिल्ह्याधिकाऱ्यावर हात उचलल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेशमधील भिंड येथील भाजप आमदार नरेंद्र सिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या समस्येवरून जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांच्या बंगल्याबाहेर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खतासाठी सहकारी संस्थांबाहेर रात्रभर रांगा लावाव्या लागत आहेत, तरीही त्यांना फक्त एक किंवा दोन पोती खत मिळत आहे. आणि तीच खते बाजारात मात्र चढ्या दराने विकली जात आहेत. पण प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव त्यांच्या बंगल्याच्या गेटवर आंदोलकांशी बोलण्यासाठी आले तेव्हा आमदार नरेंद्र सिंह कुशवाहा त्यांना शिवीगाळ करू लागले. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडे बोट दाखवत म्हटले, ‘तुमच्या मर्यादेत बोला.’ हे ऐकून आमदारांचा राग वाढला आणि त्यांनी मुठी आवळून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू चोरी होऊ दिली जाणार नाही असे सांगितले तेव्हा आमदारांनी ‘तू सर्वात मोठा चोर आहेस’ असे प्रत्युत्तर दिले. वाद इतका तापला की आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना कानाखाली मारण्यासाठी हात वर केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
नरेंद्र सिंह कुशवाह हे कायमच वादात राहिले आहेत. अनेकदा त्यांनी त्यांच्याच सरकारला अडचणीत आणले आहे. याआधीही त्यांनी पक्षात बंडखोरी केली होतो. दरम्यान या घटनेमुळे आगामी काळात जोरदार वाद होण्याची शक्यता आहे.