
मोठी बातमी! मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव
शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी, गाडीवर बॉटल फेकल्या, कारचा पाठलाग, आझाद मैदानावर तुफान राडा
मुंबई – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. विरोधी पक्षातील खासदार आणि आमदार मनोज जरांगे यांची भेट घेताना दिसत आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, पण यानंतर मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीला घेराव घातला.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानावरून आपल्या कारकडे जात होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी केली. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. यावेळी काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवलं. मराठा आंदोलक आक्रमक झालेले असताना सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला आणि प्रत्येकाला हस्तांदोलन केले. सर्वांनाच नमस्कार करून त्या कारमधून निघून गेल्या. मात्र काही आंदोलकांनी त्यांची कार सुद्धा अडवली आणि घोषणाबाजी केली. यावेळी पुन्हा एकदा काही आंदोलकांनी पुढे येत सुप्रिया सुळे यांच्या कारला जागा करून दिली. सुप्रिया सुळे यांनी कार पुढे निघून गेल्यावर काही आंदोलकांनी कारचाही पाठलाग केला. तसेच त्यांच्या कारवर बॉटल देखील भिरवली. या सर्व घडामोडीमुळे काही काळासाठी आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. मात्र, आंदोलनाचा कालावधी वाढत असताना आणि जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होताना दिसत आहेत. आरक्षणासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्यानंतर एकदिवशीय अधिवेशन घेत हा प्रश्न मार्गी लावावा. जर सरकारला करायचे असेल तर त्यांना अवघड नाहीये. कोणत्याच राजकीय पक्षाचा विरोध नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा. त्यात गरज असेल तर कायद्यात बदल करावेत आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असं सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी मात्र सर्व आंदोलकांना नमस्कार केला. तसेच प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने सामोरे जात त्यांच्या भावनांचा आदर केला. या सर्व घटनेनंतर आता मनोज जरांगे नेमका काय संदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.