
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा
एआयमुळे अभिनेत्रीच्या अधिकारांचे होतेय हनन, अश्लील छायाचित्रांमुळे अभिनेत्री संतापली, नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई – बॉलिवूडची विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे सौंदर्य वादातीत आहे. ती तिच्या सौंदर्याने चाहत्यांना आजही घायाळ करते. ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आता ऐश्वर्या ‘पर्सनॅलिटी राईट्स’च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी ती दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचली आहे.
ऐश्वर्याने परवानगी शिवाय तिचे फोटो व्यवसायिक जाहिराती करणाऱ्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याबाबत तिच्या वकिलांनी माहीती दिली आहे. ऐश्वर्या रायच्या वकिलांनी न्यायालयाला त्या वेबसाइट्स आणि कंटेंटबद्दल माहिती दिली, ज्यावर तिच्या नावाचा आणि फोटोंचा व्यावसायिक वापर परवानगीशिवाय केला जात आहे. न्यायालयात वकिलांनी एका वेबसाइटचा दाखला देत सांगितले की, अभिनेत्रीने त्यांना परवानगी दिलेली नाही, तरीही फोटो वापरले जात आहेत. दुसऱ्या वेबसाइटवर ऐश्वर्या राय यांचे वॉलपेपर आणि फोटो टाकण्यात आले आहेत, तर तिसऱ्या कंपनीकडून त्यांच्या फोटोंचे प्रिंट असलेले टी-शर्ट्स विकले जात आहेत. परवानगीशिवाय अशा प्रकारच्या कृती त्यांच्या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन आहेत आणि त्या थांबवणे अत्यंत आवश्यक आहे, असा युक्तीवाद ऐश्वर्या रायच्या वकिलांनी केला आहे. वकिलाने असा युक्तिवाद केला की तिचे मॉर्फ केलेले फोटो काही पोर्नोग्राफिक प्लॅटफॉर्मवर वापरले जात आहेत. हे प्लॅटफॉर्म लैंगिक दृश्यांमध्ये तिच्या नावाचा आणि फोटोंचा गैरवापर करून पैसे कमवत आहेत. वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकलपीठाने ७ नोव्हेंबर रोजी संयुक्त रजिस्ट्रारसमोर आणि १५ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयासमोर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
ऐश्वर्या रायने १९९७ मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलीवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. ती अनेक उत्पादनांची ब्रँड ॲम्बेसेडर देखील राहिली आहे. म्हणून तिने तिचा एआय जनरेटेड फोटोचा वापर केल्याने संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे.