
अभिनेत्याच्या लेकीने शेतकरी दाखवून खरेदी केली कोट्यवधीची जमीन
शेतकरी म्हणून ओळख दाखवणं पडलं महागात?, शासनाकडे तक्रार दाखल, सरकार करणार कारवाई, नेमकं काय घडलं?
रायगड – अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या अलिबाग तालुक्यातील थळ येथील सरकारी जमीन खरेदीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अलिबाग तहसील कार्यालयाने याबाबत दिलेला अहवाल अस्पष्ट असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा ‘सुस्पष्ट अहवाल’ मागितला आहे. पण यामुळे सुहाना खान अडचणीत आली आहे.
सुहानाने अपूर्ण कागदपत्रे आणि योग्य योग्य परवानगी न घेता ही जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात आलेली जमीन परवानगीशिवाय खरेदी केल्याचा प्रकार अलिबाग तालुक्यातील थळ येथे समोर आला आहे. विशेष म्हणजे ही जमीन अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी व अभिनेत्री सुहाना खान हिने खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे. या खरेदी-विक्रीप्रकरणाची चौकशी सुरू असून अलिबाग तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत. त्यामुळे सुहानासह शाहरुख देखील अडचणीत येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आलिबागच्या थळ येथील सर्व्हे नंबर ३५४/२ मधील ०.६०.७० हेक्टर जमीन १९६८ मध्ये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी शासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे ही जमीन फक्त शेतीसाठीच वापरली जावी असं बंधनकारक होतं. त्या वेळी ही जमीन विक्री, गहाण किंवा हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र ही अट न पाळता २०२३ मध्ये नोंदणीकृत साठे कराराद्वारे जमीन सुहाना खान हिला विकण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल १२ कोटी २१ लाख रुपयांचा हा व्यवहार परवानगीशिवाय झाल्याने प्रशासनाने आता चौकशीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या कायद्यानुसार, केवळ शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतात. मात्र, सुहानाने स्वतःला शेतकरी दाखवून ही जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे ती वादात सापडली आहे.
अलिबागमधील वकील ऍड. विवेकानंद ठाकूर यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारही केली आहे. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी अलिबागच्या तहसीलदारांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जमिनीशी संबंधित असणाऱ्या हे प्रकरण वाढल्यामुळे आता सरकारी फाईली उघडू लागल्या आहेत. त्यामुळे सुहाना खानच्या चिंतेत वाढ झाली आहे.