
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, फडणवीस यांच्या नावाला संघाचा पाठींबा, दिल्लीत हालचालींना वेग, कधी होणार घोषणा?
दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला असून, त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवड लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. पण आता यासाठी राज्यातील शीर्ष नेत्याचे नाव चर्चेत आले आहे.
भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दुहेरी भूमिकेत सध्या नड्डा काम करत आहेत. भाजपमध्ये एक व्यक्ती, एक पद असा नियम आहे. पण दीड वर्ष होऊनही भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आलेला नाही. कारण भाजप आणि संघात अद्याप एकवाक्यता आलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण चेहऱ्यासाठी आग्रही आहे. या शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. कारण अमित शहा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी पु्न्हा गुजराती व्यक्तीला संधी देण्यास संघ तयार नाही. त्यामुळे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावांना संघाचा विरोध आहे. संघाने याआधी संजय जोशी यांचं नाव सुचवलं आहे. पण त्यांच्या नावाला भाजप श्रेष्ठींचा विरोध आहे. त्यामुळे सर्वसमावेशक नाव म्हणून फडणवीस यांचे नाव समोर आले आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल अटळ आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार, हा प्रश्न समोर येईल. महाराष्ट्रातील सध्याच्या महायुती सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भाजप कोणाला संधी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याचा विचार नसल्याचे वक्तव्य केले होते, त्यामुळे नेमका काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात सध्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार सत्तेत आहे. त्यांच्यात अनेकवेळा वादाचे प्रसंग घडले आहेत. पण फडणवीस यांनी दरवेळेस त्याला अतिशय उत्तम पद्धतीने हाताळले आहे. त्यामुळे भाजप फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची शक्यता तशी कमी आहे. पण धक्का तंत्र वापरत फडणवीस यांना दिल्लीत बोलवले देखील जाऊ शकते. त्यामुळे राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे.