
पुण्यात गुंडाराज! हातात पिस्तुल घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न
गुंडांचा धुडगूस सीसीटीव्हीत कैद, पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद, पोलिसांसमोर आळा घालण्याचे आव्हान
पुणे – पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी थेट गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. त्यातही कोथरूडमध्येही अनेक अनुचित प्रकार घडले होते. तिथेत आता हातात पिस्तुल घेऊन दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या एका इमारतीत दोन गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सीसीटीव्हीमध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवत दहशत माजवली. सीसीटीव्हीमध्ये दिसते की, ३० सप्टेंबरच्या रात्री दोन गुंड सोसायटीत शिरले. त्यांच्या हातात हत्यार असून, दहशत निर्माण करण्यासाठी ते हे हत्यार दाखवत आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे. माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. प्राथमिक चौकशीत ही कारवाई घरफोडीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, कोथरूड परिसर असुरक्षित होत चालला आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे.
कोथरूड परिसरात गुन्हेगारी प्रकारांची मालिका सुरूच असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते.