
मोठी बातमी! म्हणून पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण
माजी आमदाराने मारहाण केल्याचा दावा, अजित पवार गट आणि शरद पवार गटात जोरदार राडा, बाचाबाची थेट गुद्यावर
पुणे – पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार गटासोबतच्या वादात ही मारहाण झाली आहे.
आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. काही वेळात या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. सविस्तर माहितीनुसार, आमदार पठारे हे रविवारी एका स्थानिक नागरिकाने आयोजित केलेल्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी प्रलंबित विकासकामांच्या मुद्द्यावर आंदोलानाची तयारी सुरू केली होती. यावेळी पठारे यांनी या आंदोलनाबाबत विचारणा केली. “विकासकामे सुरू आहेत, मग आंदोलनाची गरज काय?” असा सवाल त्यांनी केला. त्यावरून वाद वाढत गेला. पठारे यांनी ‘तुम्ही आमच्या जीवावर नेते झालात, आम्हीच तुमच्या मागे उभे राहिलो’ असे वक्तव्य केल्यावर वातावरण अधिक तापले. बंडू खांदवे आणि समर्थकांनी ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या मारहाणीत बंडू खांदवे यांना देखील मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच वेळ पडली तर आम्ही गाव विकत घेऊ अशी धमकी देण्यात आली. झटापटीत आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले आणि मलाही मारहाण केली, असा गंभीर आरोप खांदवे यांनी केला आहे. घटना घडून गेल्यानंतर बंडू खांदवे यांच्या समर्थकांनी आमदार पठारे यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर पठारे यांचे समर्थक आणि पोलीस घटनास्थळी आले. यावेळी पोलिसांनी दोनही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दोनही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या याठिकाणी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार गटातील मतभेद तीव्र झाले आहेत. या घटनेने या अंतर्गत कलहाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातूनच हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे. आता यापुढे काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.