
शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची आज फैसला
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी, निवडणुकीआधी राजकीय धमाका, राजकिय समीकरणे बदलणार?
दिल्ली – शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज अंतिम सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेचं नाव आणि धुनष्यबाणाचं चिन्ह कोणाच्या हातात जाणार? या खटल्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
राज्यात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी मागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. या अर्जाची दखल घेत न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी मूळ याचिकाही निकाली काढण्याचे संकेत दिले होते. याआधी या प्रकरणावर २० ऑगस्टला सुनावणी होणार होती. परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात सूर्य कांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती. अखेर आज यावर ही सुनावणी होणार असून निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. बहुसंख्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार झाले. त्यामुळे शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील दावा ठोकला. निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारावर ‘शिवसेना’ आणि चिन्ह ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेने मशाल चिन्ह देण्यात आले होते. या निकालानंतर अनेक राजकिय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
या सुनावणीत नेमका कोणाचा विजय होणार याची उत्सुकता दोन्ही शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने दोन वर्षापासून प्रलंबित असेलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.