
अजित पवार स्वतःच्या पक्षातील आमदाराला नोटीस पाठवणार
आमदाराच्या त्या वादग्रस्त विधानामुळे अजित पवार कमालीचे नाराज, इशारा देऊनही सुधारणा न झाल्याने कारवाईचा इशारा
पुणे – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे वाद ओढावला होता. त्यावर आज सकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी, ‘दिवाळी निमित्ताने बाजारपेठ आहे. सर्वांना विनंती करतो, दिवाळीची खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातील नफा रिटर्न फक्त आणि फक्त हिंदू माणसांनाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दिवाळी हिंदूंनी साजरी करावी’ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना संग्राम जगताप यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय आणि धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे जात आहोत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. यासोबतच “मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो तेव्हा ही त्याला सांगितले होते, तो म्हणाला की याच्यामध्ये सुधारणा करेन. पण ते सुधारणा करताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही.” असे अजित पवार म्हणाले आहेत.
राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातही जातीपातीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणाची सर्वाधिक चर्चा रंगलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सोलापुरातील करमाळा येथे हिंद जन आक्रोश मोर्चाला हजेरी लावली होती. त्यात केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार कमालीचे नाराज झाले आहेत.