
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांना धक्का, हे मा. आमदार गळाला
देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांवर सर्जिकल स्ट्राईक, लवकरच होणार पक्ष प्रवेश, महायुतीत वादाची ठिणगी
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सोलापूरमधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. भारतीय जनता पक्ष या निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखत असून, अनेक पक्षांतील माजी आमदार, महापौर आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याचा फटका महायुतीतील पक्षांना बसणार आहे.
भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे राज्यात भाजपची ताकद वाढत चालली आहे. सोलापुरमधील बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पंढरपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबन शिंदे यांची नावे समोर आली आहेत. या चौघांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. पण उमेश पाटील यांना झुकते माप दिल्याने राजन पाटील गट नाराज आहे. यशवंत माने हेही मोहोळमधून निवडून आले होते. ते राजन पाटील यांच्यासोबत आहेत, त्यामुळे राजन पाटील जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बबनराव शिंदे सध्या सक्रिय नसले तरी त्यांचे दोन्ही सुपुत्र भाजपाबरोबर जवळीक साधून आहेत. सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपची स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी दिलीप माने यांना भाजपात प्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. हे माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची आता फक्त तारीख ठरण्याचे बाकी आहे. दिवाळीनंतर मोठ्या कार्यक्रमात यांना पक्षात घेत शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजप प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
भाजपने सोलापूरमध्ये आपल्या मित्रपक्षाला दणका देण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहेत. त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय असणार हे गुलदस्त्यात आहे, अजित पवार गट जुळवून घेणार की राजकिय संघर्ष होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.