Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता ? आयोगाकडून महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यातही महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन-भूमिपूजनाचा कार्यक्रम आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारनंतर आचारसंहिता जाहीर केली, तर अडचण यायला नको यासाठी कार्यक्रमाची वेळही दुपारी दोनची ठेवण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारातून होत आहे. सांगली, सातारा येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल होणार आहेत. हडपसर येथील एका कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महापालिकेच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी अखेरीपर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयोगाकडून अत्यंत शिस्तबद्ध आणि ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याचे समजते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी २३ जानेवारीला सुरू होत आहे. त्यापूर्वी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर केला जावा, यासाठी सरकार आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. या दोन्ही घटनांमुळे महापालिकांच्या निवडणुका या येत्या ४८ ते ७२ तासांत जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.

भाजपने निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!