
राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून, ज्यात त्यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला आहे.

झिरवळ यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सध्या नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, मंत्री आहेत.दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे.जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते.मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी,’ अशी थेट मागणी सपकाळ यांनी केली आहे.


