
संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

हा निर्णय केवळ मीरा-भाईंदरपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असेल. १ मे पर्यंत सर्व रिक्षाचालकांची तपासणी केली जाईल. ज्यांना मराठी बोलता किंवा समजता येत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाईल असे सरनाईक यांनी सांगितले.

बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कंपन्यांच्या सेवांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.


