Latest Marathi News
Ganesh J GIF

‘नमस्कार ताकदीला अन् चमत्कारालाच होतो’; राज्यसभेची हुकलेली संधी आणि भुजबळांची थेट फटकेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. जरी भुजबळांनी वरकरणी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेले एक सूचक वक्तव्य आता प्रचंड व्हायरल होत आहे. “काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात,” असे म्हणत भुजबळांनी नाव न घेता पक्षांतर्गत नेत्यांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

“नमस्कार ताकदीला आणि चमत्कारालाच होतो!”

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी अत्यंत रोकठोकपणे राजकीय वास्तवावर भाष्य केले. ते म्हणाले, “गेल्या २६ वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात. पुढे बोलताना त्यांनी ताकदीचे महत्त्व अधोरेखित केले. नमस्कार हा ताकदीला आणि चमत्कारालाच होतो. एखाद्या नेत्यामागे किती आमदार, खासदार किंवा नगरसेवक आहेत, यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शनाचे संकेत दिले आहेत.

“इतरांच्या कुटुंबीयांसारखा आम्हालाही न्याय मिळावा”

राज्यसभेवर जाण्याची इच्छा असलेल्या छगन भुजबळ यांनी यापूर्वी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. या सर्व घडामोडींवर बोलताना भुजबळांची सल पुन्हा एकदा ओठांवर आली. “पक्षातील इतर नेत्यांच्या कुटुंबियांना जसा न्याय मिळतो, तसाच न्याय आपल्यालाही मिळावा,” अशी जाहीर अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

एकीकडे आपली नाराजी अप्रत्यक्षपणे मांडत असतानाच, भुजबळांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पदे मर्यादित असतात, पण पक्ष सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना वाटते की पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली नाही, मात्र प्रत्येकाने पक्षासाठी काम करत राहिले पाहिजे आणि एकजुटीने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!