
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. मनोहर मामा हा स्वतःला बाळुमामाचा अवतार म्हणवून घेत होता.

एका तरुण रियल इस्टेट व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे. २१ एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथे एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असतांना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का? असे विचारले. मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे. त्या विध्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील असे म्हणत विश्वास संपादन केलं.

त्यानंतर मनोहर भोसले यांना व्हिडीओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली. त्यानंतर भोसले याने आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच पूजेसाठी दोन लाख रुपये खर्च असून ५० हजार रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं.
करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितलं असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50 हजर रुपये संबंधित व्यक्तीला दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. तसेच मनोहर मामाने देखील पूजे संदर्भात कोणतंही संपर्क केला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसले विरोधात तक्रारदाराने दिली आहे. त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

