
दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी आपल्या सासू, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रियंका शिवकुमार खबाले (वय-25, धंदा नोकरी, रा. सध्या रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे, मुळ रा. रांझणी, ता. माढा, जि. सोलापुर) असे महिला अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी खबाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती शिवकुमार श्यामराव खबाले, सासू शोभा शामराव खबाले, सासरे श्यामराव खबाले, ननंद लक्ष्मी खबाले, दीरअमर खबाले, दीर मंगेश खबाले, (सर्व रा. कळंब, एस.टी. स्टेंड जवळ, ता. कळंब जि. धाराशिव)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचा विवाह डिसेंबर 2021 मध्ये कळंब (जि. धाराशिव) येथील शिवकुमार खबाले याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी प्रियंका यांच्या कुटुंबीयांनी 5 तोळे सोने, 4 लाख रोख आणि 5 लाखांचे प्रापंचिक साहित्य दिले होते. लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर प्रियंका आजारी पडल्या असता, सासरच्यांनी त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. “तुझ्या आई-वडिलांकडे जाऊन उपचार कर,” असे म्हणत त्यांना माहेरी पाठवून दिले. प्रियंका यांनी पुढील शिक्षणासाठी संगणक क्लास लावल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. क्लासला जाऊ नये म्हणून त्यांना घरातील कामाचा जादा बोजा दिला जात होता. तरीही प्रियंका यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. 15 मे 2022 रोजी त्यांनी पोलीस भरतीची अकॅडमी लावली असता, त्यांच्या पतीने दारू पिऊन तिथे येत “भरती झालीस तर तुला नांदवणार नाही,” अशी धमकी दिली होती.प्रियंका 29 मे 2023 रोजी पोलीस दलात भरती झाल्या. ट्रेनिंग पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाल्यानंतरही सासरच्यांकडून त्यांचा छळ सुरूच होता. प्रियंका त्यांच्या पगारातून घरातील खर्च चालवत होत्या, तरीही पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. “तुझ्यासारख्या स्त्रीला आमच्या घरात जागा नाही,” असे म्हणत डिसेंबर 2025 मध्ये त्यांना घराबाहेर काढले.

सध्या प्रियंका या शिंदवणे येथे भाड्याच्या खोलीत एकट्याच राहत आहेत. तिथे आल्यावरही पतीने दोन ते तीन वेळा येऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. सासरच्या लोकांच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर प्रियंका यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गौरी क्षीरसागर करीत आहेत.


