
श्रीगोंदा तालुक्यात ‘समर्थ क्रॉप केअर’ कंपनीच्या नावाखाली राबवण्यात आलेल्या कथित गुंतवणूक घोटाळ्याला मोठे वळण मिळाले आहे. तब्बल १० टक्के मासिक परताव्याचे आमिष दाखवत हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत अनिल गवळीसह ९ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत अनिल गवळी, त्याची पत्नी ज्योती प्रशांत गवळी, अमृता प्रकाश सुपेकर, नागनाथ धोंडिबा जाधव, नवनाथ दगडू जाधव, सुदामदास प्रकाश मांगणे, चंद्रकांत राऊत, नागेश नामदेव जगताप, आविष्कार सुरवसे व मनीषा सुदाम दास अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुंतवणूकदार विक्रांत प्रशांत जाधव यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने जादा परताव्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. विक्रांत जाधव यांची तब्बल १८ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित नसून पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांसह राज्यभर पसरलेला असल्याचे चित्र आहे.’समर्थ क्रॉप केअर’ टोळीने राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे ४० ते ४५ हजार गुंतवणूकदारांकडून ४ ते ५ हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर रक्कम गोळा केल्याचा गंभीर आरोप आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनी आर्थिक अडचणीत गेल्यानंतर गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत मिळालेला नाही. उलट, “लवकरच पैसे मिळतील” अशी आश्वासने देत वेळकाढूपणा केल्याचे आरोप आहेत.

या प्रकरणात आधीच पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा यांनी प्रशांत गवळीला अटक केली होती. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांनीही सुमारे ४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, या घोटाळ्यातील इतर आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर श्रीगोंद्यातील गुन्हा दाखल झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.दरम्यान, फसवणुकीच्या या महाघोटाळ्याचे राज्यभरात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. १०% परताव्याच्या गोड बोलांनी हजारो नागरिकांना आर्थिक खाईत ढकलणाऱ्या या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. “झटपट नफा” या आमिषामागील धोका पुन्हा एकदा समोर आला असून, अशा योजनांपासून सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


