
आळंदीत खळबळ! इंद्रायणी नदीच्या पात्रात दोन महिलांचे मृतदेह आढळले; वारकरी नगरी हादरली, घातपात की आत्महत्या?
तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरात इंद्रायणी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह बुधवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास आढळून आले. यात ४५ ते ५० आणि ३० ते ३५ वयोगटातील दोन महिलांचा समावेश असून, दोन्ही मृतदेह ३ ते ४ दिवस जुने असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

दोन्ही महिलांनी साडी परिधान केलेली असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

आळंदी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डॉक्टरांच्या अभिप्राय आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, महिलांची ओळख पटवण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस इतर पोलिस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत आहेत.


