
पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेला ‘धिंड पॅटर्न’ वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुणे पोलिसांनी याप्रकरणी नरमाईची भूमिका घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या असून, आरोपींची धिंड काढण्यावर आणि त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

मानवी हक्क आयोगाची कारवाई अन् पोलिसांचा ‘यू-टर्न’

भारती विद्यापीठ आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींची भररस्त्यात गुडघ्यावर बसवून धिंड काढल्याचे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.राज्य मानवी हक्क आयोगाने (NHRC) या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. या घटनेचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार असल्यामुळे पुणे पोलीस प्रशासनाने तातडीने सावध होत हे नवीन परिपत्रक जारी केले आहे.

पोलीस आयुक्तांचे ५ कडक आदेश
कोणत्याही आरोपीची भररस्त्यात धिंड काढणे, हातपाय बांधून मिरवणे किंवा सार्वजनिक अपमान होईल अशी वागणूक देणे यावर पूर्ण बंदी असेल.अटक आरोपींचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ (BNSS) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार मानवी हक्कांचा सन्मान राखूनच पुढील कारवाई केली जाईल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा आयुक्तांनी दिला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची नोंद ठेवावी लागेल.
सुरक्षेचा प्रश्न की मानवी हक्क?
गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी काढल्या जाणाऱ्या ‘धिंड पॅटर्न’वर आता बंदी आल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस पुढे कोणती नवी रणनीती वापरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

