
माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी होणारा सततचा छळ आणि पतीचे अनैतिक संबंध याला कंटाळून आशा प्रवीण घोटेकर या विवाहितेने आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना बेड्या ठोकल्या असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

आईची जमीन विकून दिले पैसे, तरीही छळ सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार, आशा घोटेकर यांचा विवाह झाल्यापासूनच सासरच्या मंडळींकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता. फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि आलिशान चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी २५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी लावून धरली होती. बहिणीचा संसार टिकवावा आणि तिने सुखात राहावे, यासाठी आशा यांच्या भावाने स्वतःच्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून ही मोठी रक्कम सासरच्यांच्या पदरात टाकली होती. लग्नात २१ तोळे सोनेही देण्यात आले होते. मात्र, एवढी धनदौलत देऊनही सासरच्यांची पैशांची हाव काही मिटली नाही.

पतीचे अनैतिक संबंध आणि जादूटोण्याची धमकी
मृताच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आशा यांचा पती प्रवीण घोटेकर याचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यावरून घरात वारंवार वाद होत असत. पीडितेने विरोध केला असता तिला मारहाण केली जात असे. तसेच, “तुला जादूटोणा करून मारून टाकू,” अशी भीती घालून तिला सतत धमकावले जात होते.
पोलिसांची कारवाई: पतीसह दोघे अटकेत
अखेर सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आशा घोटेकर यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती प्रवीण घोटेकरसह दोन जणांना अटक केली आहे. या क्रूर कृत्यात सासरचे आणखी किती लोक सामील आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

