
लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आणि दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लकडेवाडी येथे घडली आहे. या घटनेत खंडू श्रीमंत भिसे (वय ५५) असे मृत पित्याचे नाव असून, पोलिसांनी संशयित आरोपी मुलगा पृथ्वीराज खंडू भिसे (वय ३२) याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

लकडेवाडी गावापासून काही अंतरावर भिसे कुटुंबीय राहते. मृत खंडू भिसे आणि त्यांचा ३२ वर्षीय मुलगा पृथ्वीराज यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. पृथ्वीराज याला दारूचे मोठे व्यसन होते. आपले लग्न करून द्यावे यासाठी तो वडील खंडू यांच्याकडे सतत तगादा लावत होता आणि याच कारणावरून घरात वारंवार भांडणे होत असत.

वाद विकोपाला गेला आणि…
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडील खंडू हे नेहमीप्रमाणे घरात बसलेले होते. याच वेळी पृथ्वीराज हा दारू पिऊन घरात आला. त्याने पुन्हा एकदा “माझे लग्न का लावून देत नाही?” असे म्हणत वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता दोघांमधील हा वाद अत्यंत विकोपाला गेला.दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात पृथ्वीराजने शेजारी असलेला मोठा दगड थेट वडील खंडू यांच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की खंडू भिसे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी मुलगा पृथ्वीराज भिसे याला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लकडेवाडी परिसरासह संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

