Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाचा लॉजमध्ये संशयास्पद अंत; घातपाताच्या संशयाने पाचोऱ्यात नातेवाईकांचा तीव्र संताप

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रवींद्र संजय मोरे असे मृत तरुणाचे नाव असून, अवघ्या महिनाभरापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडल्यामुळे मोरे कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला आहे. हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील एका लॉजिंगच्या खोलीत रवींद्र गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. हा प्रकार उघडकीस येताच त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना तरुणाचा असा गूढ अंत झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, रवींद्रच्या कुटुंबीयांनी आत्महत्येचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ज्या तरुणाचा नुकताच साखरपुडा झाला होता, तो इतके टोकाचे पाऊल कधीच उचलणार नाही, असा ठाम विश्वास नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्याचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय व्यक्त करत संतप्त नातेवाईकांनी रवींद्रचा मृतदेह थेट पाचोरा पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास करून संशयितांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात बराच वेळ तणावाचे वातावरण होते.सध्या पाचोरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास चक्रे वेगवान केली आहेत. रवींद्र त्या लॉजवर कोणाला भेटण्यासाठी गेला होता का, घटनेच्या वेळी तिथे आणखी कोणाची उपस्थिती होती का, आणि हा घातपात आहे की आत्महत्या, या सर्व अंगांनी पोलीस सध्या शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!