Latest Marathi News
Ganesh J GIF

‘लाडक्या बहिणींचा महायुतीला श्राप लागणार, सत्यानाश होणार!; वडेट्टीवारांचे नागपुरात खळबळजनक विधान

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचरी आणि थेट टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजना, जागावाटप आणि भाजपच्या रणनितीवरून सरकारला सडकून धारेवर धरलं. विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवर गंभीर आरोप केले आहेत. योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय.

वडेट्टीवार काय म्हणाले?

“८० लाख लाडक्या बहिणी कमी केल्या, याचा अर्थ फक्त निवडणुकीपुरता त्यांचा वापर झाला. आता निवडणुका झाल्या, त्यामुळे ‘लाडकी बहीण तुझा आणि आमचा काय संबंध’ असं सरकारचं वागणं आहे. भाऊ इकडे आणि बहीण तिकडे! भाऊ खुर्चीवर बसून मज्जा करत दाबून माल खात आहे, महाराष्ट्र लुटत आहे आणि लाडक्या बहिणींना मात्र हवेवर सोडून दिलं आहे.”पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारला थेट इशारा दिला की, ज्या ८० लाख महिलांना योजनेतून बाहेर काढलंय, त्यांचा श्राप या महायुती सरकारला लागणार आणि महिलांचा श्राप मोठा असतो, यामुळे यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही.

‘काँग्रेसमुक्त भारत’ नाही, भाजप आता ‘काँग्रेसयुक्त’

भाजपने निवडणुकीसाठी काँग्रेसमधून आलेल्या चार उमेदवारांना तिकीट दिल्यावरून वडेट्टीवारांनी भाजपची जोरदार खिल्ली उडवली. ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा देणाऱ्या भाजपवर त्यांनी खोचक टोला लगावला.”मी आता काँग्रेसवाल्यांना सांगतो की, आपण सगळेच भाजपात जाऊ आणि भाजपला घेऊन काँग्रेसमध्ये येऊ, म्हणजे देश ‘भाजपमुक्त’ होऊन जाईल! आज अर्ध्याहून जास्त मुख्यमंत्री, आमदार आणि विधान परिषदेचे उमेदवार काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यामुळे ‘काँग्रेसमुक्त’चा नारा देणारी भाजप आता स्वतःच ‘काँग्रेसयुक्त’ झाली आहे.”

एवढी ताकद असूनही भाजप निवडणुकीला घाबरलेली आहे, म्हणूनच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, असा दावा वडेट्टीवारांनी केला. तर दुसरीकडे काँग्रेस पूर्ण ताकतीने मैदानात उतरली असून चंद्रपूरमधून शैलेंद्र अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अग्रवाल हे केवळ व्यापारी नसून किसान सेलचे राष्ट्रीय सचिव आणि तीन-चार राज्यांचे प्रभारी आहेत, असं सांगत वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराची ताकद अधोरेखित केली. एकंदरीत, विजय वडेट्टीवार यांच्या या विधानांमुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत. आता वडेट्टीवारांच्या या ‘श्राप’ आणि ‘सत्यानाश’ या शब्दांना महायुतीचे नेते काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!