Latest Marathi News
Ganesh J GIF

‘आम्ही किती दिवस काम करणार…’; मंत्री गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात निवृत्तीच्या चर्चा!

भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे संकटनिवारक मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार का? असे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.

चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन आणि विकासकामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या जाहीर कार्यक्रमात बोलताना दोन्ही मंत्र्यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, याच वेळी महाजन यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी आगामी काळातील नेतृत्वाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत? कधीतरी कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावीच लागणार आहे. अशा वेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावसं वाटतं.” महाजन यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी एक प्रकारे राजकारणातून निवृत्तीचेच संकेत दिले आहेत की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रवासाचा उल्लेख करत महाजन पुढे म्हणाले, “सुरुवातीला जेव्हा भारतीय जनता पक्षाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने चाळीसगावात विकासकामांचा धडाका लावला आहे, ते पाहून आता आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो.”

‘मंगेश चव्हाण यांच्यात कामाची भूक’ – गुलाबराव पाटील

यावेळी बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “कामाची भूक असलेला नेता म्हणजे आमदार मंगेश चव्हाण! त्यांनी चाळीसगावचा विकास करताना गिरीश महाजन यांच्याच मार्गाने काम केले आहे, ही गोष्ट इतर आमदारांनाही सांगावी लागेल. चाळीसगाव हे महत्त्वाचे शहर असून जिल्ह्यापासून दूर आहे, त्यामुळे येथे विकासकामे होणे गरजेचे होते. मंगेश चव्हाण यांनी इथे खरोखरच मोठे काम करून दाखवले आहे,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी चव्हाण यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

एकीकडे चाळीसगावच्या विकासकामांचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या ‘वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार’ या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात असून, उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!