
पोळा सणाचा उत्साह असतानाच भुसावळ शहरात गुरुवारी (१० सप्टेंबर) रात्री एक थरारक आणि धक्कादायक हत्याकांड घडले आहे. आई आणि एका रेल्वे कर्मचाऱ्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांचा संशय मनात धरून अवघ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत क्रूरपणे ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. भुसावळ शहरातील पाटीलमळा परिसरात ही घटना घडली असून, या हत्येने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

‘वडील नाशिकला गेलेत’ असे सांगून बोलावले; असा रचला हत्येचा कट

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित मुलाच्या आईचे आणि तुषार सोनवणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. यावरून मुलाच्या मनात राग आणि संशय निर्माण झाला होता, ज्यातून त्याने काही दिवसांपूर्वीच तुषार यांच्या हत्येचा कट रचला होता. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित मुलाने तुषार यांना फोन करून “माझे वडील नाशिकला गेले आहेत” असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर तो स्वतःच्या दुचाकीवरून (MH 19 CH 1405) तुषार यांना आणण्यासाठी पाटीलमळा परिसरात गेला.

चालत्या दुचाकीवर पाठीमागून मान आणि डोक्यावर वार!
तुषार यांना सोबत घेऊन परत येत असताना, चाणाक्ष संशयिताने दुचाकी चालवायला तुषार यांच्याकडे दिली आणि स्वतः मागे बसला. घराजवळ पोहोचताच, दुचाकी सुरू असतानाच मुलाने पाठीमागून चाकू काढून तुषार यांच्या डोक्याच्या खालील भागावर (मानेवर) आणि पाठीवर सपासप वार केले. या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तुषार गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
स्थानिक गुन्हे शाखेची तत्परता; संशयित पोलिसांच्या जाळ्यात
घटनेनंतर तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. गंभीर जखमी तुषार यांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुसावळ शहरातच गस्तीवर होते. हत्येची बातमी मिळताच पथकाने काही अंतरावर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन संशयिताचा पाठलाग करून त्याला तत्काळ ताब्यात घेतले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पोहोचून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
पोळा सणाच्या तोंडावर घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे शहरात तणावाचे सावट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे करत आहेत.

