Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राईक!; गणेश, भवानी आणि नाना पेठेतून ४५ लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त

पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित अन्नसाठा प्रशासनाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील भेसळखोर आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कुठे आणि काय झाली कारवाई?

‘एफडीए’च्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पेठ भागातील विविध प्रतिष्ठानांवर छापे टाकले. जप्त करण्यात आलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

गणेश पेठ येथील ‘मे. वर्धमान एंटरप्रायझेस’वर धाड टाकून अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा ७ लाख ८२ हजार ९३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या पदार्थांवर आवश्यक माहिती नसणे आणि लेबलिंगमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच याच परिसरातील ‘मे. न्यू पांडियन एंटरप्रायझेस’ येथून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा ५८ हजार ६२० रुपयांचा माल जप्त केला.

भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळील माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामातून सर्वाधिक मोठी कारवाई झाली. या गोदामातून सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा तब्बल ३६ लाख ३९ हजार ३८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या गोदामाकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असणारा परवाना किंवा नोंदणीही नव्हती.

नाना पेठ येथील ‘मे. गोयल सेल्स कॉर्पोरेशन’मधून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा ६९ हजार ८३५ रुपयांचा माल जप्त केला. या पदार्थांवर चुकीचे ब्रँडिंग केल्याचा संशय आहे. याशिवाय ‘मे. विजय लक्ष्मी ट्रेडर्स’ येथून राईस ‘०’ नंबर शेव आणि फरसाण जप्त करण्यात आले.

सातारा-सांगलीतील ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित, कराडमध्ये कृत्रिम दूध उघड!

पुण्यातील कारवाईसोबतच एफडीएने सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही कडक पावले उचलली आहेत. स्वच्छता आणि नियमांचे पालन न केल्याप्रकरणी विभागातील ५ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कँटिनचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.

परवाने निलंबित झालेली हॉटेल्स:
१. न्यू सम्राट हॉटेल (सातारा)
२. हॉटेल केशर (सातारा)
३. हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट (सातारा)
४. मैत्री चायनीज सेंटर (सांगली)
५. हॉटेल ‘२५२० गावरान तडका’ (सांगली)

कराडमध्ये कृत्रिम दुधाची भेसळ उघड

या कारवाईदरम्यान सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मानवी आरोग्याशी खेळणारा कृत्रिम दूध तयार करण्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पथकाने कारवाई करत ५ लिटर म्हशीचे दूध आणि दुधात भेसळीसाठी वापरले जाणारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त केले आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!