
शिक्रापूरमधून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्याच मित्राचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही तर हत्येचा पुरावा लपवण्यासाठी त्याने आपल्या अवघ्या १९ वर्षांच्या पत्नीची मदत घेतली आणि मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत पती-पत्नी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा २६ जुलै रोजी दुपारी झाला. शिक्रापूर येथील करंजेनगरच्या एका मोकळ्या मैदानात, झुडपांमध्ये पोत्यात भरलेला एक अज्ञात तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत सोशल मीडिया आणि गुप्त माहितीच्या आधारे तो मृतदेह गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) या तरुणाचा असल्याचं निष्पन्न केलं.

संशयातून घेतला जीव, पती-पत्नी ताब्यात
मृत गौरव हा करंजेनगर येथे त्याचा मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत रूममेट म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून कडाक्याचे वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.याच संशयाच्या धाग्यावरून पोलिसांनी तात्काळ मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत गौरवच्या आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुकेश आणि जान्हवी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

