सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट
आई आणि बछड्याच्या भेटीच्या सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल
सातारा दि २५(प्रतिनिधी) – सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी म्हणजे २० सप्टेंबरला बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले होते. बछड्याचे वय पाहता तो आईपासून दुरावल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे रामघळ परिसरात आढळलेल्या त्या बछड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बछड्याला ताब्यात घेत त्याची आणि आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यांचा प्रयत्नाला यशही आलं. आई आणि बछड्याची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माय-लेकाच्या भेटीचा सुंदर क्षण सध्या व्हायरल झाला आहे.
बिबट्याच्या या लहान बछड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे तो भयभीत झाला होता.पण वन विभागाने बावधनमधील रेस्क्यूटीम, सह्याद्री पोट्रिकस फौंडेशन आणि साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.मादी बिबट्याने आपल्या पिल्लाला सुरक्षित अधिवासात नेलं आहे.