
विलेपार्ले (पश्चिम) येथील अभिजित रेसिडेन्शियल इमारतीत घडलेल्या वॉचमन मोहन यादव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा जुहू पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एका श्रीमंत व्यावसायिकाचे घर लुटण्यासाठी अडीच वर्षांपासून हा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

दारू पाजली, गळा आवळला अन् मृतदेह टाकीत फेकला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी आरोपी इमारतीमध्ये दाखल झाले. चोरीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या वॉचमन मोहन यादव यांना आरोपींनी आधी दारू पाजली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून अतिशय निघृणपणे खून केला.हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोहन यादव यांचा मृतदेह इमारतीतील पाण्याच्या टाकीत फेकून दिला.

स्वयंपाकीच निघाला कटाचा मुख्य सूत्रधार!
या संपूर्ण हत्याकांडाचा आणि चोरीच्या कटाचा मुख्य सूत्रधार जोगेश्वर मल्लिक हा आहे, जो पीडित व्यावसायिकाकडे स्वयंपाकी (Cook) म्हणून काम करत होता. मल्लिकने व्यावसायिकाच्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी मिळवली होती. तब्बल अडीच वर्षांपासून तो या चोरीची योजना आखत होता. या कटात त्याने विजय गोंजारे याच्यासह इतर तिघांना सहभागी करून घेतले होते.
हत्या केली, पण चोरीचा प्रयत्न ठरला अयशस्वी
वॉचमनची हत्या केल्यानंतर आरोपींनी डुप्लिकेट चावीच्या आधारे फ्लॅटमध्ये प्रवेश करून व्यावसायिकाच्या कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारणास्तव त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पकडले जाण्याच्या भीती पोटी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जुहू पोलिसांची धडक कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून जुहू पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी डुप्लिकेट चावी नेमकी कुठे आणि कशी बनवून घेतली? या संपूर्ण कटात आणखी कोणाचा अप्रत्यक्ष सहभाग आहे का? या दृष्टीने जुहू पोलिस आता अधिक तपास करत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
केवळ चोरीच्या उद्देशाने एका निष्पाप वॉचमनचा जीव गेल्याने आणि घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच असा कट रचल्याने विलेपार्ले परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हाय-प्रोफाईल सोसायट्यांमधील सुरक्षा यंत्रणा आणि घरगुती कामगारांच्या ‘पोलीस व्हेरिफिकेशन’ (Police Verification) चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

