
चाकण, आळंदी अन् खेड मिळून बनणार नवी ‘महापालिका’!, ५० गावांचा समावेश; दीड वर्षांपासून लटकलेल्या प्रस्तावाला अखेर वेग
औद्योगिक विकासामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या चाकण आणि खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरूनगर या तीन नगरपरिषदांसह लगतच्या सुमारे ५० गावांचा समावेश करून स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा शासनदरबारी तीव्रतेने चर्चेत आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला चाकणमधील भीषण वाहतूक कोंडी आणि उद्योगांवर होणाऱ्या परिणामांमुळे अखेर चालना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी महापालिका आवश्यक

चाकण परिसरात देश-विदेशातील अनेक ऑटोमोबाईल आणि मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प आहेत. मात्र, औद्योगिकीकरणाच्या तुलनेत रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनासारख्या पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत मंद गतीने झाला आहे.वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत असून काही कंपन्या चाकणमधून इतरत्र स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या मर्यादित निधीमुळे हा अफाट ताण पेलणे स्थानिक प्रशासनाला अशक्य जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र महापालिका असणे काळाची गरज बनली आहे.

पुणे-पिंपरी महापालिकेवर ताण; हद्दवाढ अशक्य
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या हद्दीत यापूर्वीच अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या महापालिकांची हद्द आणखी वाढवणे प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य ठरेल, असा निष्कर्ष काढण्यात आला. म्हणूनच चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरूनगर या तीन महत्त्वाच्या शहरांसह आसपासच्या गावांना जोडून नवीन महापालिका निर्माण करण्याचा पर्याय पुढे आला आहे.
प्रशासनाकडून स्वतंत्र महापालिकेची शिफारस
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे जिल्हा प्रशासनाने या नवीन महापालिका स्थापनेला अनुकूलता दर्शवली आहे. तीन नगरपरिषदा आणि लगतच्या सुमारे ५० गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी शिफारस सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने यावर निर्णय घेतल्यास चाकण-खेड परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.

