
व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे नात्यांची मर्यादा कशी विसरतात, याचा एक अत्यंत सुन्न करणारा आणि मन सुन्न करणारा प्रकार पुण्यात समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या किरकोळ कारणावरून एका ३२ वर्षीय मुलाने स्वतःच्या पोटच्या आईची चाकूने सपासप वार करून निघृण हत्या केली. विश्रांतवाडी भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुलाला घटनास्थळावरूनच बेड्या ठोकल्या आहेत.

आईचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू

या दुर्दैवी घटनेत सविता सुरेश हरिभक्त (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून, सागर सुरेश हरिभक्त (वय ३२) असे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. आरोपी सागरने दारू खरेदी करण्यासाठी आई सविता यांच्याकडे पैशांचा हट्ट धरला होता. मात्र, आईने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात आणि व्यसनाच्या धुंदीत असलेल्या सागरने घरातील धारदार चाकू उचलून आईच्या गळ्यावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन जागेवरच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांची धाव आणि पोलिसांची धडक कारवाई
घरातून अचानक येणारे किंचाळण्याचे आणि भांडणाचे आवाज ऐकून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी लागलीच विश्रांतवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पानहळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सागरला घटनास्थळावरूनच अटक केली. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) [हत्या] अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

