
अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेवरून हडपसरमध्ये संताप ! तातडीने नूतनीकरणाची मागणी; प्रशासनाकडून आश्वासन
हडपसर परिसरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जीर्ण झालेल्या इमारती, तुटलेले पत्रा शेड, दुर्गंधीयुक्त ओढा, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे निवेदन देत स्मशानभूमीचे तातडीने नूतनीकरण आणि अद्ययावत सुविधांची मागणी करण्यात आली आहे.हडपसर,अमनोरा आणि मगरपट्टा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली अमरधाम स्मशानभूमी मात्र आज याच स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचा आरोप क्रांती शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

स्मशानभूमीतील सार्वजनिक शौचालयाची भिंत जीर्ण झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ही धोकादायक भिंत हटवून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच स्मशानभूमीच्या मागील बाजूने वाहणाऱ्या ओढ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही प्रश्न गंभीर बनला आहे. घाण आणि सांडपाण्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ओढ्याचे काँक्रिटीकरण करून संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मशानभूमीतील गंजलेले आणि तुटलेले पत्रा शेड काढून त्याठिकाणी आधुनिक, उंच आणि वॉटरप्रूफ शेड उभारावे, अशीही मागणी आहे. इतकेच नाही तर अमरधाम स्मशानभूमीत आधुनिक गॅस किंवा विद्युत दाहिनी, दशक्रिया विधीसाठी सुसज्ज घाट, शीतगृह, शववाहिका नियंत्रण कक्ष, हायमास्ट दिवे आणि अखंड वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करून सुशोभीकरण करावे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, मोठ्या टाऊनशिप्समुळे अमरधाम स्मशानभूमीवर वाढता ताण येत असल्याचा मुद्दाही यांनी क्रांती शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या निवेदनाची दखल घेत हडपसर-मांजरी क्षत्रिय प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक प्रशांत तुपे यांनी लवकरात लवकर अमरधाम स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. निवेदनातील मागण्यांनुसार स्मशानभूमीतील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही देण्यात आले आहे.


