
अजित पवारांनी गायले ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणे
अजित पवारांच्या स्वभावाचा नवीन पैलू समोर, आमदार राणांनाही टोला
उस्मानाबाद दि १(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात.आपल्या खास लहेज्यातील भाषणशैलीसाठीही ते ओळखले जातात. विनोदी प्रसंग सांगत श्रोत्यांना ते सभेत खिळवून ठेवतात.पण उस्मानाबादच्या सभेत त्यांचा एक वेगळाच स्वभाव अनुभवायला मिळाला. एका सभेत अजित पवार यांनी चक्क एक गाणे गात आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अजित पवारांचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्त्याने अजित पवारांना चिट्ठी पाठवत आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या हे लक्षात येताच त्यांनी आपले भाषण थांबवले आणि त्या कार्यकर्त्यांची चिट्ठी द्या रे असं म्हणत थेट ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं चिट्ठी आयी हैं’ हे गाणे गायला सुरुवात केली. या वेळी श्रोत्यामध्ये एकच हशा पिकला. टाळ्या वाजवत त्यांनी गाण्याला दाद दिली. कार्यकर्त्याचा प्रश्न जाणून घेतल्यावर अजित पवार म्हणाले की, “मी या प्रश्नाकडे लक्ष घालतो. मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा कारखाना असो किंवा कुणाचाही असो, भाव दिलाच गेला पाहिजे. राणा भाजपात गेले असले तरी आमचं बोलणं बंद आहे असं काही नाही. मी त्यांच्याशीही बोलेन. मी त्यांनाही विचारेल की उसाच्या दराबाबत वस्तुस्थिती काय आहे.” असे आश्वासन पवारांनी दिले.
अजित पवार आपल्या भाषणात अधूनमधून कार्यकर्त्यांची फिरकी घेत असतात एकदा त्यांच्या सभेत एक दारुडा आला होता. त्यावेळी हा दुपारीच चंद्रावर गेला आहे म्हणत खडसावले होते. तर एका सभेत वारंवार कार्यकर्ता त्यांच्या नावाच्या घोषणा देत असल्याने तुझ्या गावातील ग्रामपंचायत कोणी जिंकली म्हणत फिरकी घेतली होती. आणि आज गाणे गात सर्वांना चकित केले आहे.