
सासरच्या मंडळींचा होणारा त्रास असह्य झाल्याने विवाहितेचा टोकाचा निर्णय…
मेहकर तालुक्यातील घटनेने सारेच हळहळले, पोलीसांकडुन कारवाई
बुलढाणा दि ३(प्रतिनिधी) – नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर होत असताना बुलढाण्यात हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक मानसिक छळाच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलीसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राधिका पवन खेत्री असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी मृत राधिकाचा विवाह देऊळगाव माळी येथील पवन विश्वनाथ खेत्रेसोबत झाला होता.त्यांना आठ महिन्याची गाैरी नावाची मुलगी देखील आहे. लग्न झाल्यापासून सासारकडील मंडळी राधिकाला सतत माहेरवरून पैसे आण असा तगादा लावत होते. मुलीचा त्रास बघून राधिकाच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या लोकांसोबत बैठका घेत दोन वेळेस पैसे दिले देखील होते. तरी राधिकाला होणारा त्रास चालूच होता. त्यामुळे सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून राधिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आठ महिन्याची चिमुकली आईच्या प्रेमाला मुकली आहे.
राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राधिकाच्या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. राधिकाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.