राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे भाजपाच्या वाटेवर?
राष्ट्रवादीच्या या निर्णयावर अमोल कोल्हेंची नाराजी, शिबीरालाही दांडी
पुणे दि ७(प्रतिनिधी)- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसापासून चर्चा आहे. त्याला आणखी बळ मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या शिबिराला मारलेली दांडी.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आगामी निवडणूकीत त्यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिर्डी येथे मंथन बैठक झाली. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आजारी असूनही हजर होते. मात्र त्यावेळी ठणठणीत असलेल्या कोल्हेंची अनुपस्थितीत समोर आली. मागील काही काळापासून त्यांनी पक्षापासून अंतर राखले आहे. नथुराम गोडसे चित्रपटावरुन त्यांना पक्षातून पहिल्यांदा विरोध झाला. त्यानंतर त्यांची भुमिका असलेल्या शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. पण राष्ट्रवादीने या चित्रपटाबद्दल साधारण भुमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हे पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्षाच्या मंथन शिबिरात कोल्हे हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती यावर मार्गदर्शन करणार होते.पण ते न आल्याने पक्षातील नेते, कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. काही महिन्यापूर्वी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरूरमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार अशाही चर्चा रंगत होत्या.त्यामुळे कोल्हे अस्वस्थ असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
अमोल कोल्हे यांची भाजपशी वाढती जवळीक लपून राहिलेली नाही. राज्यातील भाजप नेत्यांबरोबरच वरिष्ठ पातळीवरही त्यांची जवळीक आहे म्हणूनच कदाचित त्यांना लाल किल्ल्यावर चित्रीकरणाची परवानगी मिळाली होती. त्यातच शिरूर मधून पार्थ पवारला उमेदवारी मिळाल्यास आपले काय? याचे राजकीय गणित ओळखून ते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.