मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामिनासाठी अनेकवेळा अर्ज केले होते. मात्र त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच गेली होती. सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आला होता. मात्र, राऊत हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला होता. पण न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला आहे. हा राऊत आणि ठाकरे गटालाही मोठा दिलासा मिळाला आहे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. पण राऊतांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ईडीकडून केली जाण्याची शक्यता आहे.
राऊत हे पत्राचाळ पुनर्विकासात सक्रिय सहभागी होते. राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोपही ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध करताना केला होता. आता संजय राऊत पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताना दिसतील. त्यामुळे ते नेमके कधी बाहेर येणार याकडे लक्ष असणार आहे.